सोमवार, २६ डिसेंबर, २०११

परसात बैसुनी फांदीवरती बाळ
सोडुनिया साबण-फुगे खेळतो खेळ
हातात घेउनी फेनिल साबण-पाणी
नभ सारे भरले फुग्याफुग्यांनी गोल,
नभ सारे-तारे, रविशशि, धरती, गोल...

‘ही माय मराठी ज्ञानोबा-शिवबाची,
होनाची आणिक ‘कृष्ण’ ची, ‘मयुरा’ ची-
परि हाय! मोजिते आहे क्षण शेवटचे...’
बहु तळमळ , आस्था होती व्याखानात
अन मानधनाचा ‘रेट बोर्ड’ दारात...

नित येती-जाती प्रसंग बांके येथे
लाखाची गर्दी सांत्वन करण्या जमते-
‘काळजी करु नका, परमेश्वर वर आहे...’
लाखात एकही परि ना देत दिलासा,
‘निश्चिंत रहा रे, मी पाठीशी आहे!’

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

क्षणभरहि ना कधी दिला कुणि तिज वेळ
पाहिली तिने पण प्रत्येकाची वेळ
कोणास लाविले नाही वाट पहाया,
ना अडवुनि धरिले तिने कधी कोणाला,
पिंडास काकही क्षणात एका शिवला...

पिंडास काकही क्षणात एका शिवला
निश्चिंत उसासा ज्ञातीने टाकियला-
‘बापुडी! कशाची धरली नाही आशा...’
राहील कशावर कशी तियेची आशा
आयुष्य तियेचे- होते एक निराशा!

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

‘अन माझ्या मागे काही काहि नुरावे,
रंग-रूप अथवा नाव, गावही जावे
जाव्यात पुसोनी अस्तित्वाच्या रेषा....’
वाटते तुवां ही निरीच्छतेची हद्द
परि त्यातचि ये मज उत्कट इच्छा-गंध!..

-शेवटी फळाला आले तप सर्वांचे
शहरात मिळाले छोटे घर भाड्याचे
मंडई, पिठाची गिरणी, पाणी, शाळा-
आवश्यक ते ते समीप सगळे होते,
अन दरापुढती स्मशानसुद्धा होते...

येताना होते दोन्ही डोळे मिट्ले
अन जातानाही तसेच होते मिटले
क्षण एक उघडले आणिक पुन्हा मिटले...
क्षण एक उघडले, आणिक पुन्हा मिटले
ते-तेच तेव्हढे, जीवन आहे इथले!
हातात घेउनी विशाल पसरट थाळी
जेविते कधीची यमराजाची स्वारी
शिजलेली-कच्ची शिते आणखी तुकडे
ना भूक सरे, सरणारहि ना कधिकाळी
ही दुनिया आहे पांचालीची थाळी...

ही दुनिया म्हणजे आहे शाळा एक
विद्यार्थी आहे येणारा प्रत्येक
पंतोजी आहे पेंगत वरती बसला
अभ्यास करा, वा नका करू, ना शिक्षा
शाळेला येणे हीच येथली शिक्षा..

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

विश्वाला अवघ्या संजीवनि वाहोनी
धावतात सरिता तीरावर घेवोनी
उद्ध्वस्त घाट अन जीर्ण मंदिरे, थडगी...
परि एखादीचे असते भाग्य विशाल
तीरावर असतो झळकत ताजमहाल!...

‘पेरणी करा परि आस नको कणसाची
तरु लावा परि कामना नको सुमनाची’
सांगशी जगाला कर्मयोग जगदिशा!
सांगशी जगाला कर्मयोग जगदिशा,
परि नको धरू रे, तूहि फळाची आशा!!