रविवार, २९ जानेवारी, २०१२

भाकरी, चपाती, भाजी, पिठले, भात-
अन सणासुदीला पक्वानांचे ताट
आयुष्य असे हे घासांमागुनी घास...
आयुष्य असे हे लक्ष- शेंकडो घास
अन अंती होऊन जाणे एकचि घास....बुधवार, २५ जानेवारी, २०१२

तो आला होता कोठुनी, कळले नाही
तो गेला कोठे, तेही कळले नाही
तो आला होता-एकचि होते सत्य!!
तो आला होता, कसे वदावे सत्य?
तो आला होता, होता केवळ भास....

‘-अन स्वर्गामधुनि ईश्वर तो येईल,
येईल आणखी रूप नवे घेईल
संस्थापन करण्या नूतन युगधर्माची!!’
यावरी नको रे विसंबूस तू आता-
हो हरि-हर तूची, घेउनि त्रिशूळ-चक्रां!!!

‘कवितेने दिधले तुजला लौकिक, नाव-
कवितेने दिधले बहुत मानसन्मान
त्वां काय दिले रे, कवितेला-’ मी पुसता
तो वदला, ‘अवघे जीवन दिधले तिजला
रविवार, २२ जानेवारी, २०१२

मंदिरे पाडुनी बांधियल्या मसजिदी
मंदिरे बांधिली पाडुनिया मसजिदी
दिन-रात घुमतसे घोष ऋचा-कलमांचा!
परि भिंतींमधल्या दगडां पडतो प्रश्न
कोणता आपुला धर्म, कोणता पंथ?

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

रस्त्याला लागुन दुकान छॊटॆ आहे
बरणीत सुपारी कात-चुनाही आहे
तो देतो बांधुन पट्टी विविध तर्हेची
जन येती आणिक पान-तमाखु खाती
पिचकारी पहिली तिथेच मारुनी जाती...

मी होतो तेव्हा बादशहा निद्रेचा
जी आणित होती नजराणा स्वप्नांचा!
स्वप्नांचा श्रावण अखंड बरसत होता
परि हाय! आज ती एकही ना दे स्वप्न
निद्राच जाहली आहे आता स्वप्न...

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

‘म्हणतात माऊली -’ येते आरंभाला
‘म्हणतात तुकोबा -’ शेवट हा ठरलेला
कीर्तनात अवघ्या बुडून जातो गाव...
संतांची वचने तेथे नित तो कथितो,
चुकुनहि ना कथितो, स्वत: काय तो म्हणतो...

मी, आम्ही, तुम्ही, तो, ती,ते अन त्याही-
कोणीच कधी वा येथ निधर्मी नाही
ही गाय, बैल वा घोडा, गाढव अथवा...
-शोधिता आढळे एक परंतु तैसा,
आढळे निधर्मी एकच - केवळ पैसा!!

त्वेषात धावले तिकडुनि ‘कुराण’ वाले
त्वेषात इकडुनि, तसेच ‘पुराण’ वाले
तलवारी, भाले, विळे, कोयते, ढाली...
मग परस्परांनी दिले-घेतले प्राण
मानवता हतबल, गलितगात्र, निष्प्राण!!

पूर्वीचे काही उरले नाही आता
ते प्रेम, जिव्हाळा,आत्मिय माया, ममता-
गाठते रसातळ अवमूल्यन मूल्यांचे...
संतांची वाणी घेते अंतिम श्वास
साबणाससुद्धा ये ना आता फेस...

मग उत्साहाने जावे धरण्या काही
हातास लागते उलटे काहीबाही-
हे नशिब तुटके, फुटके, विटके रकटे...
नववेलींवरची नवकुसुमे सुकुमार,
नजरेच्या स्पशे-सुकुनी, हो निर्माल्य!!

शेवटी हजारो लोकांच्या साक्षीने
घेतला पेट, क्षण गमले की गगनाने-
जन गर्जु लागले मोदे,‘रावण मेला!”
मग मनात आले रावण कसला मेला
होऊन ‘चिरंजिव आठवा’ आहे बसला...

रविवार, ८ जानेवारी, २०१२

`बिशी ब्याळी अन्ना-’ बेत जाहला मस्त
पाहता पाहता सगळे झाले फस्त,
शेवटी राहिला एक घास इवलासा!
‘खा उद्या सकाळी, टिकेल-’ वदली दारा
- तो टिकेल, पण तो टिकेल का खाणारा?

या इथे असो, सूर्योदय वा सूर्यास्त-
निद्राधिन आहे अवघे जग हे मस्त
जोमात वाढतो आहे वट स्वप्नांचा...
पाहतात कोणी मधुस्वप्ने रात्रीची,
अन तशीच कोणी स्वप्ने- पण दिवसाची!


कागदी अश्व अन धवल शुभ्र गजराज
कातडी पांघरुनि गरजतात वनराज
मोहरमी व्याघ्र बहु, तसे इसापी कोल्हे...
प्रतिप्रहराला नव खेळ रंगतो आहे-
गगनाच तंबू, सर्कस चालू आहे!

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

परसात बैसुनी फांदीवरती बाळ
सोडुनिया साबण-फुगे खेळतो खेळ
हातात घेउनी फेनिल साबण-पाणी
नभ सारे भरले फुग्याफुग्यांनी गोल,
नभ सारे-तारे, रविशशि, धरती, गोल...

‘ही माय मराठी ज्ञानोबा-शिवबाची,
होनाची आणिक ‘कृष्ण’ ची, ‘मयुरा’ ची-
परि हाय! मोजिते आहे क्षण शेवटचे...’
बहु तळमळ , आस्था होती व्याखानात
अन मानधनाचा ‘रेट बोर्ड’ दारात...

नित येती-जाती प्रसंग बांके येथे
लाखाची गर्दी सांत्वन करण्या जमते-
‘काळजी करु नका, परमेश्वर वर आहे...’
लाखात एकही परि ना देत दिलासा,
‘निश्चिंत रहा रे, मी पाठीशी आहे!’