मंगळवार, १० जानेवारी, २०१२

‘म्हणतात माऊली -’ येते आरंभाला
‘म्हणतात तुकोबा -’ शेवट हा ठरलेला
कीर्तनात अवघ्या बुडून जातो गाव...
संतांची वचने तेथे नित तो कथितो,
चुकुनहि ना कथितो, स्वत: काय तो म्हणतो...

मी, आम्ही, तुम्ही, तो, ती,ते अन त्याही-
कोणीच कधी वा येथ निधर्मी नाही
ही गाय, बैल वा घोडा, गाढव अथवा...
-शोधिता आढळे एक परंतु तैसा,
आढळे निधर्मी एकच - केवळ पैसा!!

त्वेषात धावले तिकडुनि ‘कुराण’ वाले
त्वेषात इकडुनि, तसेच ‘पुराण’ वाले
तलवारी, भाले, विळे, कोयते, ढाली...
मग परस्परांनी दिले-घेतले प्राण
मानवता हतबल, गलितगात्र, निष्प्राण!!

पूर्वीचे काही उरले नाही आता
ते प्रेम, जिव्हाळा,आत्मिय माया, ममता-
गाठते रसातळ अवमूल्यन मूल्यांचे...
संतांची वाणी घेते अंतिम श्वास
साबणाससुद्धा ये ना आता फेस...

मग उत्साहाने जावे धरण्या काही
हातास लागते उलटे काहीबाही-
हे नशिब तुटके, फुटके, विटके रकटे...
नववेलींवरची नवकुसुमे सुकुमार,
नजरेच्या स्पशे-सुकुनी, हो निर्माल्य!!

शेवटी हजारो लोकांच्या साक्षीने
घेतला पेट, क्षण गमले की गगनाने-
जन गर्जु लागले मोदे,‘रावण मेला!”
मग मनात आले रावण कसला मेला
होऊन ‘चिरंजिव आठवा’ आहे बसला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा